Wednesday, December 2, 2015

शिक्षणमंत्री महोदयांस पत्र
-------------------------------------------
 आदरणीय तावडे साहेब , खरं तर आम्ही आमची मते आपणापुढे मांडणे उचित नाही, कारण आपणास विनाअनुदानित शाळांच्याबाबतचा सर्व विषय ज्ञात आहे.तरीपण असे का होत आहे माहित नाही.
     राजकारण ,सत्ता म्हटलं की प्रत्येकाचे विचार वेगळे असतात परंतू त्यात भरडला जातोय तो  विनाअनुदानित शाळेवर काम करणारा सर्वसामान्य शिक्षक!  साहेब ! गेली 15 वर्षे आपण सत्तेची वाट पहात होता, त्याहीपेक्षा कितीतरी आतुरतेने आम्ही तुमची सत्ता येण्याची वाट पहात होतो, कारणही तसेच होते तुमच्याशिवाय या गंभीर प्रश्नाकडे पहाणारा नेता नाही, हे आम्ही ओळखून होतो.कारण आपण विरोधी पक्षात असताना आंदोलन स्थळी आपण भेटी द्यायचा..... पोटतिडकीने आमच्यासाठी बोलायचा, हे अजून आम्ही विसरलो नाही. आणि त्यामुळेच यावेळी आमच्या सर्व बांधवांनी आपल्याच बाजूने काम केले. साहेब गेली 15 वर्षे एक दमडी न घेता काम करणार्‍या शिक्षकाचीच एवढी अग्निपरीक्षा का घेतली जातेय ?
 साहेब , शाळा बोगस आहेत असे आपणास वाटते, कदाचित असेलही परंतू त्याला जबाबदार कोण आपलेच अधिकारी ना ? मग त्यांच्यावर कारवाई का नाही ? साहेब, पाठीवर मारा पण पोटावर मारू नका . हीच कळकळीची हात जोडून नव्हे तर पूर्ण दंडवत घालून आपणास विनंती.  कारण काही कर्मचारी ५3 वर्षे वयाचे होवून ,  बिनपगारी रिटायर होण्याच्या मार्गावर आहेत,  काहींचे ३० वर्षापेक्षा जास्त वय झाले तरी लग्न ठरेना,  पगार नाही म्हणून काही शिक्षकांच्या पत्नी त्यांना सोडून जायला लागलेत. काही कर्मचारी आपल्या मुलांना शिकवू शकत नाहीत.त्यांच्या मुलींना खर्चा अभावी काँलेज शिक्षण सोडावे लागले ;  काहीजण विचार करूनच हार्टअटॅक येऊन गेले,  तर आपल्या मुलाच्या पगाराची वाट पाहून आई वडिलांचे काळीज फाटले हो!  काहींच्या मुलींचे लग्नाचे वय होवून गेलय, काही इवलीशी मुले पण शांत असतात ,   कारण त्यांना माहित आहे आपल्या पालकांना पगार नाही.  आम्ही आमच्या सर्व इच्छा आकांक्षा पगारापोटी दाबून टाकल्या पण आमच्या या निरागस मुलांना काय सांगणार!  विनाअनुदानितचा अर्थ कसा समजवणार,   पगाराविना त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार! साहेब?     पोलीस खात्यात सुध्दा आर.आर.आबांनी छाती भरेना परंतू उमेदवार काटक आहेत म्हणून त्याबाबत शिथिलता आणली.  मग या विनाअनुदानित शाळांनाच एवढे निकष कठीण का?  आणि कसेबसे ते पूर्ण करून अनुदानास पात्र असून त्यांची फेरतपासणी का?  ज्यांना अनुदान दयायचे आहे त्यांची पाच सहा वेळा तपासणी आणि जे 40-50 हजार पगार घेतात,  वेतनेतर घेतात,  विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देतात त्यांची शासन स्तरावरून पून्हा तपासणी झाली का?  आता लागू असलेले निकष त्यांच्याकडून पूर्ण होतात का हे कधी पाहिले आहे का?    साहेब दुसर्‍याची भाकर नाही घ्यायची आम्हाला परंतू या पुरोगामी महाराष्ट्रात असा भेदभाव का?  आम्हाला एकतर इच्छामरण दया, नाहीतर लगेच पगार तरी चालू करा.  खर्‍या अर्थाने आपण स्वतंत्र झालो काय? असाही प्रश्न मनात येतआम्हाला समजतय आपले सरकार नवीनच आहे विचार करायला वेळ हवा, परंतू विरोधी बाकावर असतानाच आपणास सर्वज्ञात झाले आहे हे आम्हाला माहित आहे.  विधानसभा सदस्यांचा वाढीव मानधनाचा विषय विनातक्रार मंजूर होतो आणि १८-१९ वर्षे काम करणारा शिक्षक फुकट मरतो. किती हा विरोधाभास!   कोणीतरी म्हटलयं " कष्ट करत रहा फळाची अपेक्षा धरू नका!"  पण आताच्या महागाईच्या परिस्थितीत असे चालणार आहे का?   साहेब अशी आमची हेळसांड करू नका ,   मारायचे तर एकदाच मारा अशी जिवंत फाशी देऊ नका. आमची काम करणार्‍यांची काय चूक ?  आपल्या खात्याकडून "रोष्टर" आगेन्स्ट मान्यता मिळतात , याचा दोष कोणाचा संस्थेचा,  काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा की,  शिक्षण खात्याचा ? आजही राज्यात " रोष्टर " असताना इतर जागा भरल्या गेल्यात आणि ते फूल पगार घेतायत. याची चौकशी नाही तिथे पगार वेळेत दिला जातोय आणि विनाअनुदानित शाळेला अनुदान दयायचे म्हटले की त्यांची अनेकवेळा गुन्हेगारासारखी कसून तपासणी करायची.  तपासणी करण्याबद्दल काहीच हरकत नाही ,  परंतू ज्या अधिकार्‍यांनी शाळा तपासून पात्र केल्या तेही तुमचेच होते आणि त्रेयस्त समितीचे अधिकारी पण तुमचेच! मग दोष कोणाचा प्रामाणिकपणे फुकट काम करणार्‍या शिक्षकांचा का?
तसे पाहिले तर आम्हाला कोणी
वालीच राहिलेला नाही,दाद
कोणाकडे मागायची हा प्रश्न पडतो,
खर तर
 या " शाहू,फुले,आंबेडकरांच्या "राज्यात असे घडते आहे हीच खेदाची बाब आहे.  इंग्रजांच्या काळात पण एवढा अत्याचार झाला नसेल. राज्यात काही  "मंत्र्यांनी भ्रष्टाचार"   केल्याचे आरोप होत आहेत ते आम्ही मेडियामार्फत ऐकत आहोत . म्हणजे काय सर्वांचीच चौकशी लावणे उचित आहे का ?
 मग काय सर्वच राजकीय मंडळी "भ्रष्टाचारी "आहेत असे म्हणून चालेल का?  साहेब असे नसते हो म्हणून तर आर आर आबांना सर्वांनीच त्यांच्या कार्याबद्दल सलाम केला ना! साहेब खूप शोषण होतय या विनाअनुदानित शाळेवर काम करणार्‍या शिक्षकांचं , त्यांच्याकडे पहाण्याचा समाजाचा, अधिकार्‍यांचा आणि आता राजकीय मंडळींचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे सवतीच्या मुलासारखी वागणूक मिळतेय. विचार करा साहेब .. न्याय हवाय अन्याय नकोय!   नाहीतर ही "भारत भूमी कधीही कोणाला सोडणार नाही".  कदाचित शब्द "कटू "असतील पण फक्त "पदांची तात्पुरती अदलाबदल "  करून पहा म्हणजे विचार करा मी 15 वर्षे बिनपगारी काम करतोय.  अहो कल्पनासुध्दा करवत नाही.  आम्ही नाही आमची पोटतिडीक बोलतेय.  माणूसकी म्हणून तरी विचार करा आणि पगार चालू करा.१७ वर्षे किती पैसा वाचलाय शासनाचा ?   नकळत आम्हीच वाचवलाय ना तो?
पगार न घेता काम करून.  मग आता तरी एवढा विचार कशासाठी करताय? "पिढी घडवण्याच" चांगल काम आम्ही करतोय.   एकीकडे अंगणवाडी सेविकांना वाढीव तरतूद होतेय , डी.ए.वाढतोय, आम्ही मात्र उपाशी परंतू शासन नियमांना अधिन राहून काम करतोय साहेब , लोक आंदोलने करून क्षीण झालेत ,  त्राण नाही राहीला त्यांच्या शरीरात ११०आंदोलने करून "अपयशच " येत असेल तर काय करणार?  राज्यात दुसर्‍या क्षेत्रात एवढी "वाताहात" कोणाचीच झाली नाही    तेवढी
आमच्या "शिक्षकबांधवांची "झाली आहे.  साहेब सरळ "शाळा बंद" करण्याचे "आदेश " दया किंवा "पगार" तरी त्वरीत चालू करा किंवा आपण जबाबदारी स्विकारून "इच्छा मरण" तरी द्या !
"असह्य झालयं साहेबअसह्य !!"
------------*********-------------------
---खंडेराव जगदाळे सर,कोल्हापूर-----
       व  पूर्ण महाराष्ट्रातील
 कायम स्वरुपी विना अनुदानित  शाळेवर १८-१९ वर्षापासून काम करणारे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर     कर्मचारी ..(पुढे पाठवत रहा)
"शिक्षक जगला तर देश जगेल."
☀☀☀☀☀☀☀☀☀